पिंपरी – चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक असणारे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवार नाना काटे यांना शुभेच्छा दिल्या.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत एक लाखाचे मतदान घेणारे नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र राजकारणात शेवटच्या क्षणी एका खासदाराच्या हट्टापायी नाना काटे यांचे तिकीट कट करण्यात आले.
तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी थेट चिंचवडच्या विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांना दोन्ही उमेदवारांच्या वरती नाराज असणाऱ्या लोकांची साथ मिळताना दिसत आहे. याच निर्मित नाना काटे यांनी आज माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी नखाते यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन ही केले.
यावेळी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, राज तापकीर, शुभम नखाते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नखाते यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी करत जगतापांच्या घराणेशाहीला विरोध केला होता. आज नाना काटे आणि चंद्रकांत नखाते यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीने चिंचवड मधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.




