
पुणे : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान ३५ लाख ११ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली असून सदरची रक्कम जप्त केली आहे.
जिल्हा व राज्य सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी करत प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत अनेक ठिकाणी रोख रक्कम आढळून आली आहे. त्यानुसार चाफेकर चौक येथे पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका चार चाकी वाहनातून पोलिसांनी ३५ लाख ११ हजार २०० रुपये इतकी रोख रक्कम जप्त केली आहे.




