मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. लोकसभेला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यानंतर आता विधानसभेला अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार राजकीय आखाड्यात आहेत.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत माध्यमांशी बोलताना राजकीयदृष्ट्या एकत्र येणं शक्य नाही, असे म्हंटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” आता राजकीयदृष्ट्या एकत्र येणं शक्य नाही. अजित पवार आणि त्यांचा पक्ष हे भाजपाचे मित्रपक्ष आहेत, त्यामुळे आमच्या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत.
अजित पवार यांच्याशी राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येणं अवघड आहे. जोपर्यंत ते भाजपासाठी काम करीत आहेत, तोपर्यंत ते कदापि सोपे होणार नाही. राजकीयदृष्ट्या आमच्या विचारसरणीत मतभिन्नता आहे”, असं सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.
तुम्ही मुख्यमंत्री होणार का? यावर बोलताना त्या म्हणाल्या , “मी विधानसभेची निवडणूक लढवत नाही अन् मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. महाविकास आघाडीमध्ये स्पष्टता आहे, त्यामुळे आमचे मित्र पक्ष जो निर्णय घेतील, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ,” असंही सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.



