
पिंपरी- शहरातील निगडीमधील दुर्गादेवी टेकडी ७५ एकर क्षेत्रफळावर विस्तारली आहे. ही टेकडी पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यटन केंद्रच बनले आहे. येथे लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य महापालिकेने ठेवले आहे. शहरातील सर्वच भागांतून ज्येष्ठ नागरिक आणि पालक मुलांना घेऊन या टेकडीवर येत असतात. सद्या:स्थितीत या टेकडीची दुरवस्था झाली आहे. दुर्गादेवी टेकडीची दयनीय अवस्था झाली आहे.
दररोज लहान मुले येथे खेळण्यास येत असतात. वृद्ध नागरिकदेखील फिरण्यास येतात. पण, उद्यानांची तुटलेली खेळणी, अस्वच्छता, वाढलेले गवत आणि सुकलेली झाडे पाहून नागरिकासह लहान मुलांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे येथील खेळणी तत्काळ बदलण्यात यावी. मैदानाची झालेली दूरवस्था दूर करावी. सतीश कदम
नेमकी समस्या काय?
या टेकडीवरील लहान मुलांसाठी असलेली खेळणी, तसेच नागरिकांसाठी ठेवलेले बाक तुटले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खेळणी तुटल्याने लहान मुलांचा हिरमोड होत आहे. देखभालीअभावी टेकडीवरील काही झाडे सुकली आहेत. सर्वत्र गवत उगवले आहे. जागोजागी पालापाचोळा पसरल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाचे म्हणणे काय?
टेकडीवरील खेळणी दुरुस्त केली जातील. बाक बसविण्यात येतील. टेकडीवर नियमित स्वच्छता केली जाते.
राजेश वसावे, उद्यान अधीक्षक
पिंपरी-चिंचवड महापालिका




