पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चर्चेत असताना, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून भारतीय जनता पक्षातर्फे एक, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातर्फे दोन, तर उर्वरित स्थानिक तीन पक्षांकडून प्रत्येकी एक अशा अवघ्या सहा महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित १५ महिलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यांपैकी पर्वती मतदारसंघात सर्वाधिक सात महिला उमेदवार असून, दहा मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार नसल्याने सर्वपक्षीयांना महिला उमेदवारांबद्दल विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महायुतीकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. अल्पावधीतच या योजनेला प्रतिसाद मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्येही ‘लाडकी बहीण’ योजनेला प्राधान्य देण्यात आले आहेत. महिलांची मते मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू असताना, महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्ष मागे असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुणे शहरात आठ, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, तर उर्वरित ग्रामीण भागात दहा असे एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. ८८ लाख ४९ हजार ५९० मतदारांपैकी ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार आहे. तुलनेत ४९ टक्के महिला मतदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांपैकी २१ महिला उमेदवार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहून उमेदवारी जाहीर केली आहे. पर्वती मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यामान आमदार माधुरी मिसाळ या उमेदवार आहेत, तर याच मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातर्फे अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पिंपरीतही महिला उमेदवार दिली आहे. डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी दिली आहे.
पुरंदर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या कीर्ती माने, हडपसर मतदारसंघातून हिंदुस्तान जनता पक्षातर्फे सविता कडाळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षातर्फे छाया जाधव या तीन महिला मतदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उर्वरित जुन्नर, आंबेगाव, दौंड, बारामती, पुरंदर, पिंपरी, भोसरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या ११ मतदारसंघांतून १५ महिला अपक्ष लढत आहेत.
मतदारसंघ – महिला उमेदवार
● जुन्नर – १
● आंबेगाव – १
● दौंड – १
● बारामती – ४
● पुरंदर – १
● पिंपरी – २
मतदारसंघ – महिला उमेदवार
● भोसरी – १
● पर्वती – ७
● हडपसर – १
● पुणे कॅन्टोन्मेंट – १
● कसबा पेठ – १
● एकूण – २१
दहा मतदारसंघांत महिला उमेदवार नाही
खेड आळंदी, शिरूर, इंदापूर, भोर, मावळ, चिंचवड, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड आणि खडकवासला या दहा विधानसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही.




