पिंपरी : लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या जवानाच्या अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे महावितरण कार्यालयासमोर घडला.
अमोद कांबळे (वय २७, रा. भोसरी) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मूर्तजा अमीरभाई बोहरा (वय ३२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे वय १७ वर्षे आहे. तो मूळचा आसामचा असून तो लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान असून आसाम सीमारेषेवर कार्यरत आहेत. अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या मोटारीमधून शनिवारी भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. त्याने मद्या प्राशन केले होते. त्याच्यासमवेत त्याचा एक मित्रही मोटारीत होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता. असे असताना मद्या प्राशन करून तो भरधाव वाहन चालवित होता.
पुणे – नाशिक महामार्गावर महावितरणच्या कार्यालयासमोर मुलाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटार रस्ता दुभाजकावरून विरुद्ध बाजूला गेली. याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या रिक्षा आणि दोन दुचाकींना भरधाव मोटारीने ठोकरले. त्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. आरोपी अल्पवयीन मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. फौजदार पंकज महाजन तपास करीत आहेत.
अपघाताच्या घटना
पुण्यातील कल्याणीनगर येथे बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे या अलिशान कारखाली दोघांना चिरडून ठार मारले. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. मात्र, या घटनेनंतरही असे प्रकार वारंवार घडत आहेत. सात जुलै रोजी पिंपळे-सौदागरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत सीआयडीच्या पोलीस हवालदाराचा मृत्यू, सात ऑगस्ट पिंपळे-गुरव येथे मद्या प्राशन केलेल्या मोटारचालकाने दुचाकीवरील दोघांना फरफटत नेले, एक नोव्हेंबर रोजी रावेतमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके उडवीत असताना भरधाव मोटारीच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू झाला.