पुणे : शहरातील महायुतीच्या प्रचाराची सांगता पदयात्रा, दुचाकी फेरी आणि वैयक्तिक गाठी-भेटींनी सोमवारी झाली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सरसावलेल्या ‘लाडक्या बहिणी’ प्रचाराच्या शेवटच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. प्रचाराची सांगता झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह भेळ भत्त्यावर ताव मारला.
विधानसभा निवडणुकीसाठी शहरात महायुतीकडून आठही जागांवरील निवडणूक लढविण्यात येत आहे. यातील कसबा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला हे सहा मतदारसंघ महायुतीतील भारतीय जनता पक्षाकडे असून, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला दोन आठवड्यांपूर्वी खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
शहरातील महायुतीच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने प्रारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशातील अन्य राज्यांतील मंत्री, केंद्रीय मंत्र्यांकडून समाज घटकांचे मेळावे, बैठका घेऊन प्रचार केला गेला. प्रचाराचा शेवटचा दिवस, म्हणजे सोमवार पदयात्रा, कोपरा सभा, महिलांचे मेळावे, पक्षाच्या विविध आघाड्यांच्या बैठका, मतदानाचे नियोजन करण्यात खर्च झाला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण यांची महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा आणि दुचाकी फेरी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झाली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही कसब्यात दुचाकी फेरी झाली. कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वतीच्या उमेदवारांनी प्रचारफेऱ्यांवर भर दिला. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून आले. मतदारसंघातील पक्षाचे प्राबल्य आणि ताकद असलेल्या ठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हार-तुरे, फटाके वाजून उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी गटागटाने कोपरा सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
उमेदवारांकडून प्रत्यक्ष प्रचार सुरू असतानाच उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयांकडूनही मतदारांना दूरध्वनी करून संपर्क साधण्यात आला. प्रचारफेरीदरम्यान उमेदवारांच्या प्रचार पत्रकांचेही वाटप करण्यात आले. जनसंपर्क कार्यालयांतून प्रचाराचे नियोजन होत असल्याने कार्यालयांतही मोठी लगबग होती. गेल्या १५ दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्याने शेवटच्या दिवशी प्राबल्य असलेल्या भागातच प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर राहिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लखपती दीदी, महिलांना एसटी प्रवासातील ५० टक्क्यांची सवलत या लोकप्रिय योजनांची माहिती पुन:पुन्हा मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून धावपळ सुरू होती.