मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर सर्वांचे लक्ष आता बुधवारी होणाऱ्या मतदानाकडे लागले असून निवडणूक मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावी यासाठी यंत्रणा सज्ज आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे एक लाख समजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी दिली.
राज्य विधानसभेच्या २८८ तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यावेळी २०४ महिलांसह ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९४ मतदारांसाठी एक लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन मतदान मार्गदर्शन पत्रके देण्यात आली आहेत.
८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच अपंग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी ८६,४६२ अर्ज मंजूर केले असून त्यांना गृहमतदानांची सुविधा देण्यात आली. अपंग मतदारांसाठी मतदान केंद्री रॅम्प, व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
● संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
● राज्याची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण यांबाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत.
● आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर अवैध रोख रक्कम, दारू, अवैध अग्निशस्त्रे, अंमली पदार्थ, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता कठोर उपाययोजना करण्यात आल्याचेही आयोगातील सूत्रांनी सांगितले.
● निवडणुकीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यासंह राज्यातील पोलीस, गृहरक्षक दलाचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानादरम्यान गोंधळ घालणाऱ्या किंवा मतदारांवर दबाव आणणाऱ्या समाज कंटकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
● परवानाकृत ५६ हजार ६३१ अग्नीशस्त्रे जप्त करण्यात आली असून २८ हजार ५६६ अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
● राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी प्रचारकाळात बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.