पिंपरी : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत झालेल्या पिंपरी मतदारसंघात यंदा ५१.७८ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी २५ हजार ३७९ अधिक मतदारांनी मतदान केले आहे. १.६१ टक्क्यांनी वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आ. अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शीलवंत यांच्यासह १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मात्र, खरी लढत बनसोडे आणि शीलवंत यांच्यातच झाली आहे. पिंपरीत २,०४,००५ पुरुष तर १,८७,५६८ महिला आणि इतर ३४ असे ३,९१,६०७ मतदार आहेत. यापैकी १,०५,३९७ पुरुष, ९७,३६० महिला तर इतर नऊ अशा २,०२, ७६६ मतदारांनी ५१.७८ टक्के मतदान केले. तर, २०१९ मध्ये ९७,०८३ पुरुष, ८०,३०१ महिला आणि इतर तीन अशा १,७७,३८७ म्हणजेच ५०.१७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. गतवेळीच्या तुलनेत यावेळी २५,३७९ अधिक मतदारांनी मतदान केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील हा मतदारसंघ राखीव आहे. हा मतदारसंघ झोपडपट्टीबहुल असून निगडी, प्राधिकरण, आकुर्डीसारखा मध्यम आणि उच्चभ्रू परिसरही येथे आहे. मोठी बाजारपेठ असलेला पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, प्राधिकरण, आकुर्डी या भागात उत्साहात मतदान झाले. या पट्ट्यात शीलवंत यांना अधिक मतदान झाल्याचे बोलले जात आहे. तर, झोपटपट्टीबहुल भागातून बनसोडे यांना चांगले मतदान झाले आहे. शेवटच्या एका तासात नऊ टक्के मतदान झोपडपट्टी भागातील केंद्रावर झाले आहे. हे वाढलेले मतदान कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात पडणार यावरच पिंपरीचा निकाल अवलंबून असेल. वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, विस्कळीत पाणीपुरवठा हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. लाखाच्या पुढे मतदान घेणारा उमेदवार पिंपरीचा आमदार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.




