पिंपरी : दुरंगी आणि चुरशीची लढत झालेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानातही चुरस दिसून आली. भोसरीत ६१.५४ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी मतदानात वाढ झाली. हे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. उमेदवारांची भिस्त ही समाविष्ट गावांतील मतांवर असून, हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यासह ११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. भोसरीत २०१९ मध्ये १,४७,६७२ पुरुष तर महिला १,१५,३३७ आणि इतर तीन अशा एकूण २,६३,०४८ मतदारांनी मतदान केले होते. त्याचे प्रमाण ५९.६३ होते. यंदा मतदानात वाढ झाली आहे. १,९९,०३० पुरुष तर १,७५,३७९ महिला आणि इतर १५ अशा ३,७४,४२४ मतदारांनी ६१.५४ टक्के मतदान केले आहे. १,११,३७६ म्हणजेच १.९१ टक्के मतदान वाढले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचेही मतदान मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
समाविष्ट भागातील चऱ्होली, मोशी, चिखली, दिघी, तळवडे या भागातील मतदानात वाढ झाली आहे. या भागात सर्वाधिक सोसायट्या असून येथील मतदान कोणाच्या पारड्यात पडते यावर विजयाचे समीकरण अवलंबून राहील असे दिसते. महिलांचे वाढलेले मतदान आमदार लांडगे यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दोनवेळा सहज भोसरीचे मैदान मारल्यानंतर तिसऱ्यावेळी लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविलेल्या गव्हाणे यांनीही समाविष्ट भागातच प्रचारावर भर दिला होता. दोघांचीही भिस्त समाविष्ट गावांतील मतांवर आहे.




