पुणे : अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात आठ जागा जिंकून आपणच जिल्ह्याचा कारभारी असल्याचे दाखवून दिले आहे. अनेकदा रागात बोलणारे, ‘बघून घेतो’ अशी जाहीरपणे दमबाजी करणारे, एखादा शब्द चुकीचा वापरून वादात सापडणारे अजित पवार यांनी भाजपच्या संगतीत आल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात प्रचार करताना प्रचारशैलीत कमालीचा बदल केला होता. कोणतेही वादग्रस्त विधान न करता आणि वैयक्तिक टीका-टिप्पणी टाळून ‘विकास’ या मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळे मतदारांनी त्यांना साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन पक्षांच्या वर्चस्वाचा प्रश्न होता. त्यात लोकसभा निवडणुकीत एकही खासदार निवडून येऊ न शकल्याने अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन खासदार दिले होते यामध्ये शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे व बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे यांना भरघोस मतांनी विजयी करन दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना एकमेव आमदार निवडून आणता आला. तर उलट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल आठ आमदार निवडून आल्याने पुणे जिल्ह्याचे खरे कारभारी अजित पवारच आहे हे आधारित केले.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला जिल्ह्यात दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला. खेड-आळंदीमध्ये दिलीप मोहिते पराभूत झाले. या ठिकाणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे हे विजयी झाले. तसेच पुण्यात “ड्रंक अँड ड्राइव्ह” मध्ये वादग्रस्त राहिलेले आमदार सुनील टिंगरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. जुन्नरमध्ये अतुल बेनके हे यशस्वी होऊ शकले नाहीत. या मतदारसंघात मनसेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवून ते विजयी झाले.
अजित पवार यांनी पुरंदर मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी शिवसेना (शिंंदे) पक्षाचे उमेदवार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधात माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या ठिकाणी ते अपयशी ठरले. शिवतारे विजयी झाले, तर झेंडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले




