पिंपरी चिंचवड : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे त्यांची सत्ता पुन्हा स्थापन होईल. यंदाच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या विजयाची नोंद केली. भोसरी विधानसभा मतदार संघातून महेश लांडगे, पिंपरीतून अण्णा बनसोडे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून शंकर जगताप यांनी विजयी होऊन शहरवासीयांचे विश्वास अर्जित केले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक विजय…
पिंपरी चिंचवडचे तीनही आमदार महायुतीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी अतिशय मजबूत आहे. भोसरी मतदार संघातून महेश लांडगे तीन वेळा निवडून आले असून पिंपरीतून अण्णा बनसोडे यांनीही सलग नसले तरी यंदा तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. चिंचवडच्या जगताप कुटुंबाचे नाव ही अनेक दशकांच्या राजकीय परंपरेत समृद्ध आहे. त्यांच्या कुटुंबाचे राजकीय वंशपरंपरेचे असलेले महत्त्व देखील अनिवार्य आहे. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या कामाची आठवण आजही लोकांच्या मनात आहे. त्यांच्या निधनानंतर पत्नी अश्विनी ताई जगताप आमदार झाल्या. आता शंकर जगताप यांच्या विजयाने चिंचवडमध्ये त्यांची जागा भरून काढली आहे.
शहरवासीयांची मंत्रिपदाची अपेक्षा
एकूणच तिन्ही आमदारांची कामगिरी पाहता यावर्षी पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी शहरवासीयांची प्रचंड अपेक्षा आहे. मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवडला मंत्रीपदाची हुलकावणी मिळत राहिली असतानाही, महायुतीच्या विजयामुळे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना यंदाच्या मंत्रिमंडळात आपल्या प्रतिनिधीला स्थान मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, पिंपरी चिंचवड शहराच्या या विजयामुळे येत्या काळात शहरातील विकासकामांना वेग येईल आणि स्थानिक समस्यांवर अधिक लक्ष दिले जाईल. पिंपरी चिंचवडमधील उद्योगधंदे, रोजगार निर्मिती, आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत होणारा विकास आता आणखी अधिक गती घेईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात महत्वाचे टर्निंग पॉइंट
शंकर जगताप यांच्या नेतृत्वात चिंचवडमध्ये एक नवा राजकीय वारा वाहताना दिसत आहे. लोकांनी दिलेला विश्वास, महायुतीच्या विजयाची मोठी रणनीती, आणि पिंपरी चिंचवडच्या जडणघडणीतील योगदान, यामुळे पिंपरी चिंचवडला मंत्रिमंडळात स्थान मिळविणे शक्य होईल, अशी आशा बळावली आहे. तर सलग तीन वेळा निवडून येणारे महेश लांडगे यांनाही मंत्री पद द्यावे यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.
तसे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पिंपरी चिंचवड शहराला नेहमी डावलल जाते आहेश. हा डाग पुसून काढण्यासाठी तिसऱ्यांदा निवडून आलेले अण्णा बनसोडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शहरवासीयांच्या अपेक्षेला मान्यता मिळवण्यासाठी महायुतीने योग्य पावले उचलावीत, आणि पिंपरी चिंचवडला राजकारणात अधिक महत्त्वाचे स्थान द्यावे असे अनेक राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांची अपेक्षा आहे.