चिंचवड (प्रतिनिधी) पूर्वांचलातील राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणारे कै.भय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री अतुलजी जोग यांच्या जाहीर व्याख्यानाचे दि.८ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान , स्व.तात्या बापट स्मृती समिती तसेच जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण येथील कै.मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय सेक्टर २५, प्राधिकरण या ठिकाणी रविवार दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.अमरजी लांडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिनजी सोनिगरा यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या पूर्वोत्तर भागात आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय अशी छोटी राज्ये आहेत ही ठिकाणे अंतर, पहाडी क्षेत्र दळणवळण अभाव यामुळे मुख्य प्रवाहापासून वेगळी पडली होती इथल्या धर्मांतरण, फुटिरता, हिंसा या सर्व आव्हानाचा सामना करून त्यावर उपाय काढून राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या देशभक्तांपैकी एक असलेले भय्याजी काणे यांच्या जीवनाविषयी व तेथील चित्तथरारक परिस्थिती विषयी अतुलजी जोग बोलणार आहेत. वक्त्यांनी देखील जवळपास २० वर्षे त्याच भागात पूर्णवेळ सेवा कार्य केले असल्याने थेट तेथील परिस्थिती आपल्याला जाणून घेण्याची संधी मिळणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने व्याख्यानाचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.