पिंपरी : वाढदिवस, कोणतेही कार्यक्रम, सणानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी फलक लावून शहर विद्रूप करणाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेची परवानगी न घेता फलक, जाहिराती, पोस्टर्स लावणाऱ्यांवर कार्यक्रमाच्या दिवसापूर्वीच दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. अनधिकृत फलकांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभागनिहाय नागरिकांची समिती स्थापन केली जाणार आहे.
अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या कमानी, मंडप, झेंडे, फलकाबरोबरच खासगी, सार्वजनिक जागेवर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, फलक, पोस्टर, किऑक्सबाबत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करावी. कारवाईचे छायाचित्र, चित्रीकरण व पंचनामे करून ते संग्रही ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
परवानाधारक होर्डिंग चालकांनी फलकावर परवाना क्रमांक, परवाना कालावधी, परवान्याचे ठिकाण आणि क्यू आर कोड ठळकपणे दिसेल अशा दर्शनी ठिकाणी असणे बंधनकारक आहे. याबाबतची खातरजमा संबंधित अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. विविध कामांसाठी तसेच विविध सणांच्या दरम्यान तात्पुरते बूथ किंवा मंडप उभारण्यासाठी परवानगी दिल्यानंतर त्यावर कोणतेही होर्डिंग, जाहिराती लावता येणार नाहीत. या अटीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अनधिकृत फलक, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स अशा अनधिकृत बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभागनिहाय नागरिकांची समिती स्थापन केली जाणार आहे. अनधिकृतरीत्या उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थाचा वापर केला असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.




