पिंपरी : ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आराेग्य वैद्यकीय विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्ही विषाणूबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. एचएमपीव्ही विषाणूच्या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, भीतीचे वातावरण निर्माण करू नये. तसेच सर्दी, खाेकला, ताप ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




