पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजविल्याप्रकरणी प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली होती. येरवडा कारागृहातून कसबे बुधवारी सायंकाळी बाहेर आला. त्याच्या समर्थकांनी चक्क वाहन फेरी काढली. ती समाजमाध्यमावर प्रसारितही झाली. त्यामुळे याप्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजित ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रफुल्ल कसबे जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या समर्थकांनी त्यांच्याकडील चारचाकी गाड्या, तसेच २० ते ३० दुचाकी गाड्यांवरून फेरी काढली. विनापरवाना फेरी काढून, गाड्या बेदरकारपणे चालवून आरडाओरडा आणि घोषणाबाजी करून परिसरात दहशत माजविल्याचा प्रकार समोर आला. प्रकार समोर आल्यानंतर कसबे याच्यासह पन्नासहून अधिक जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील तळोजा कारागृहातून चार वर्षांपूर्वी बाहेर पडलेला गुंड गजा मारणे याच्यासाठी वाहन फेरी काढल्यानंतर शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतरच शहरात टोळ्यांवर ‘मोक्का’चे सत्र सुरू झाले होते. गेल्या चार वर्षांत सुमारे २४० टोळ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई झाली. त्यांपैकी एका कारवाईत कारागृहात असलेला प्रफुल्ल कसबे जामिनावर सुटला. मात्र, त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली फेरी त्याला कारवाईच्या फेऱ्यात अडकवणारी ठरली. त्याच्यासह टोळक्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात विविध टोळ्यांच्या गुंडांचे समर्थन करणारे आणि दहशत पसरविणारे रील, छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहेत. कारवाईनंतर हे रीलस्टार पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. पोलिसांकडून कडक कारवाईचे इशारे दिले जात असले, तरी रीलस्टार्सचे ‘चमकणे’ सुरूच असल्याचे दिसते आहे.




