पिंपरी : एक लाख रुपयांहून अधिक मालमत्ताकराची थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी, औद्याोगिक, मिश्र मालमत्तांवर लाखबंद (सील) कारवाईनंतर आता थकबाकीदारांच्या दरवाज्यासमोर बॅण्डवादन केले जाणार आहे. खासगी संस्था, शाळा व महाविद्यालये, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औद्याोगिक कारखाने, शो रुम, मंगल कार्यालये, बँका, मॉल, चित्रपटगृहे अशा बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांसमोर बॅण्डवादन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर संकलन विभाग गेल्या वर्षापेक्षा उत्पन्नात यंदा मागे आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी बैठक घेत शहरातील बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार थकबाकीदार मालमत्ताधारकांमध्ये जनजागृती, संदेशाच्या माध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मालमत्ता लाखबंदची कारवाई केली जात आहे. कररसंकलन विभागाच्या पथकांनी आतापर्यंत ४१८ मालमत्ता लाखबंद केल्या आहेत. त्यांच्याकडे ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ताकर थकीत आहे. मालमत्ता जप्ती कारवाईच्या वेळेस १ हजार ५११ मालमत्तांनी एकूण २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७४९ रुपयांचा भरणा केला आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणीची कार्यवाही करण्यासाठी स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्तांपैकी ६४ हजार २६० मालमत्तांना नव्याने कर आकारणी करण्यात आली आहे.
गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांकडे यादी
मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या ६९० गृहनिर्माण सोसायट्यांमधील ५६ हजार २३२ मालमत्तांना मालमत्ताकराची देयके बजाविण्यात आली आहेत. ६५१ सोसायटीमधील ३६ हजार ९८० मालमत्ताधारकांकडे ६९ कोटी ५६ लाख रूपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे ६५१ सोसायटींच्या अध्यक्षांना सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी देण्यात येणार आहे. या थकबाकीदारांना कर भरण्यास आवाहन अध्यक्षांनी करावे, असे पत्रही देण्यात येणार आहे.




