बारामती: तालुक्यातील पणदरे येथील एका महाविद्यालयामध्ये अल्पवयीन मुलांच्या सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करणे एकास चांगलेच अंगलट आले. दोन्ही गटांतील मुलांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात तो जखमी झाला. पणदरे एमआयडीसीतील सुतगिरणी येथे 25 जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली.
नीलेश रामदास जगदाळे (रा. जगताप आळी, पणदरे, ता. बारामती) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जगदाळे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या आत काही मुलांमध्ये भांडणे सुरू होती. त्यावेळी जगदाळे हे रस्त्याने जात होते. त्यांनी आतमध्ये जात पाहिले असता, एकमेकांकडे बघण्यावरून दोन गटांत भांडण सुरू होते.
ही भांडणे मिटविण्यासाठी हे सर्वजण पणदरे एमआयडीसीतील सुतगिरणी येथे गेले. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी नीलेश आले असता त्यांच्या डोक्यात एका अल्पवयीने मुलाने वार करण्याचा प्रयत्न केला, नीलेश यांनी तो चुकवला, तर दुसरा वार केला तेव्हा त्यांनी तो उजव्या हाताने रोखण्याचा प्रयत्न केला, पण ते जखमी झाले.




