मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे, मात्र राज्यातील इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (दि.27) पिंपरी येथे केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड, खेड, आळंदी, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर येथील पक्ष संघटनेच्या आढावा बैठका त्यांनी घेतल्या. त्यानंतर खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते.
खा. राऊत म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची पकड आहे. ही पकड कायम ठेवण्यासाठी मुंबईत स्वबळावर लढावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा अर्थ निघू शकत नाही. मुंबई सोडून राज्यातील इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीस एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे हायकमांड हे भाजप आहे. त्यामुळे भाजपने आदेश दिल्यानंतर त्यांना ते पद स्वीकारावे लागले. आपली कातडी वाचविण्यासाठी, स्वतःवरील खटले थांबविण्यासाठी ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लढत आहेत. भाजपकडून होणार्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ते सक्षम आहेत. सरकारमध्ये मंत्री असलेल्यांकडून समाजात तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरली जात आहे. आपल्या लोकांना सोडायचे आणि विरोधकांना पकडायचे यासाठी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत, अशी मार्मिक टीकाही त्यांनी केली. तसेच, भाजप देशभरात इतर पक्ष फोडण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोपही केला.




