
पुणे : विमाननगर भागातील एका बहुराष्ट्रीय ‘बीपीओ’च्या आवारात झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बीपीओ, तसेच आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली (एसओपी) तयार केली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, त्याचे पालन करण्यात येते का नाही, याची खातरजमा पोलिसांकडून वेळोवेळी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आयटी कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी मगरपट्टा सिटी येथे बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मगरपट्टा सिटी आयटी पार्क भागातील कंपन्यांचे अधिकारी, तसेच कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. त्या वेळी अमितेश कुमार बोलत होते. ‘कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा, जलद आणि सुलभ संवादासाठी कंपनीचे सुरक्षा प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, पोलिसांचा एकमेकांशी संवाद असणे गरजेचे आहे. ज्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, अशा कंपन्यांची पाहणी गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येणार आहे. तेथे पुणे पोलिसांच्या ‘माय सेफ पुणे’ योजनेची भित्तीपत्रके, तसेच क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. पोलिसांकडून कंपन्यांच्या आवारात नियमित गस्त घालण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कंपन्यांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांकडून पाहणी करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वार, बाहेर पडण्याचा मार्ग आणि कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांची देखभाल, तसेच जीपीएस यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत नियमित संवाद सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
नियमावलीत काय ?
● कंपनीतील महिलांची सुरक्षा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक.
● समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी, महिला कर्मचारी, सुुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश.
● एखाद्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल, तर संबंधित कंपनीने केलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी आणि निरीक्षण (सिक्युरिटी ऑडिट) स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना करावे लागणार.
● पोलीस अधिकारी, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, कंपनीतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेला समूह समाज माध्यमात स्थापन करावा लागणार.
● कंपनीतील प्रवेशद्वार, अंधारातील जागा, पार्किंगची जागा, तसेच परिसरातील रस्त्यांची अचानक पाहणी केली जाणार.




