पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, मोशी, भूमकर वस्ती आदी १३ परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. दूषित पाण्याद्वारे ‘जीबीएस’ची लागण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे १७ संशयित रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत. त्यानुसार शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, मोशी, भूमकर वस्ती, संत तुकारामनगर परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे.
चुकीचा संदेश प्रसारित करणाऱ्याविरुद्ध तक्रार
जलशुद्धीकरण केंद्रातील ‘फिल्टर’ मशीन बंद असून बिघाड झाल्याचे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने चुकीचा संदेश प्रसारित करणाऱ्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
ज्या भागातील पाणी दूषित आढळले आहे, त्या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ह्यओटी सोल्यूशनह्ण टाकून पाणी तपासण्यात येणार आहे. वैद्याकीय विभागाने पाण्याचे नमुने घेताना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका




