
पुणे : भारताचा विक्रमवीर फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकरने रविवारी खास पुणेकरी सोहळ्यात मी देखील अर्धा पुणेकरच आहे, असे सांगून उपस्थित पुणेकरांची मने फलंदाजी न करताच जिंकली.
चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात सचिन तेंडुलकर उपस्थित होता. माधव, श्रीकृष्ण, संजय, केदार आणि इंद्रनील या चितळे परिवारासह असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत पंडित फार्म्स येथे झालेल्या या सोहळ्यात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिनला बोलते केले.
माझ्या कारकिर्दीला १९८५ मध्ये पुण्यातूनच सुरुवात झाली. त्यानंतर माझी बहीण लग्नानंतर पुण्यात आली. त्यामुळे वरचेवर माझे पुण्यात येणे-जाणे सुरू झाले. त्यामुळे मी पूर्ण मुंबईकर असलो, तरी अर्धा पुणेकर निश्चित आहे, असे सचिनने सांगितले तेव्हा पंडित फार्म्सचा परिसर पुणेकरांच्या टाळ्यांनी गुंजून गेला.
आयुष्यात कुटुंब पाठीशी असल्याशिवाय यशाला गवसणी घालणे शक्य होत नाही. चांगल्या-वाईट क्षणात आपले कुटुंबच आपल्या बरोबर असते. क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द घडवत असताना संघाची ड्रेसिंगरूम आणि असंख्य चाहते हे देखील माझे दुसरे कुटुंबच होते. वैयक्तिक कुटुंब, ड्रेसिंगरूममधील सर्व सहकारी आणि तुम्हा चाहत्यांमुळेच मी कारकिर्दीत प्रत्येक टप्प्यात आत्मविश्वासाने उभा राहू शकलो, असेही सचिन म्हणाला.
क्रिकेट समीक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मोकळ्या गप्पा मारणाऱ्या सचिनने युवकांना यशासाठी शॉर्टकट घेणे टाळा, असा सल्लादेखील दिला. एकवेळ यश मिळाले नाही, तरी चालेल. पण, त्यासाठी असे चुकीचे मार्ग शोधू नका. प्रयत्न करत राहा. एक दिवस यशाला गवसणी घालणे तुम्हाला जमेल, असे सचिन म्हणाला.
खेळामध्ये कारकिर्द सुरू झाल्यावर अपेक्षा, ओझे हे कायम राहणार यात शंका नाही. ते असायलाच हवे. त्यामुळे खेळाडूला कामगिरी उंचाविण्यास प्रेरणा मिळते, असे सचिनने सांगितले. सचिनने त्या वेळी भाऊ अजित मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला नसता, तर मी क्रिकेटपटू म्हणून घडलो नसतो, असेही सांगितले.



