पिंपरी- राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना विकासकामांच्या मुद्यावरून जाहीर कार्यक्रमात टोला लगावला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं हे मला माहित नाही. परंतु, ज्यानं चांगलं काम केलंय, त्याला चांगलं म्हणाला शिका असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे.
भाषणा दरम्यान नक्की काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालय मंजूर केले, सुरू केले आणि आज भव्य इमारतीचे भूमिपूजन केले. असे आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले. पण यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळला. लांडगेंची ही भूमिका अजितदादांच्या जिव्हारी लागली अशी कुजबुज सुरु होताच अजितदादांनी त्यांच्या खास शैलित लांडगे यांना कानपिचक्या दिल्या.
चांगल्याला चांगलं म्हणायला शिका…
महेशला माझं नाव घ्यायला काय वाईट वाटले मला माहित नाही. आपण महायुतीत आहोत, चांगल्याला चांगलं म्हणायला शिका.. मी १९९२ मध्ये मी तुमचा खासदार झालो. ९२ ते २०१७ या कालावधीत पिंपरी चिंचवड सुधरवलं. प्रत्येक गोष्ट मी लक्ष देऊन करत असतो. अधिकाऱ्यांना विचारा मी त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करत मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्यांनी चांगलं काम केलं, त्याला चांगलं म्हणायला शिका.. एवढा कंजूसपणा दाखवू नका. मी तर दिलदार आहे, जे कोणी चांगलं काम करतो त्याला मी क्रेडिट देत असतो असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच अजित पवार यांनी महेश लांडगे यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा सर्वत्र पसरली.




