पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकाने, गोदामांसह सुमारे २२०० लघुउद्योगांवर अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. कारवाईमुळे लघुउद्याोजक हवालदिल झाले असून कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी धावाधाव सुरू आहे. मोशी, तळवडे, भोसरी, चाकण, कुरळी पट्यात भाडेतत्त्वावर जागेचा शोध सुरू केला मात्र या भागातील जागा मालकांनी जागेचे दर वाढविल्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. चारही बाजूंनी उद्याोजकांची कोंडी झाली आहे. या कारवाईमुळे सुमारे एक लाखाहून अधिक कामगार बेरोजगार झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, उद्योग, कामगारनगरी अशी ओळख आहे. शहरात आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह पाच हजार लघुउद्योग आहेत. भोसरी एमआयडीसीतील अपुऱ्या जागेमुळे लघुउद्योजकांनी चिखली, कुदळवाडी, हरगुडे, पवार वस्ती या भागात पत्राशेड उभारून उद्योग सुरू केले. उद्योजकांनी भाडेतत्त्वावर जागा घेऊन हे उद्योग सुरू केले होते. यामध्ये सुमारे एक लाखापेक्षा जास्त कामगारांच्या हाताला रोजगार मिळत होता. मात्र, वाढत्या आगीच्या घटना, प्रदूषणामुळे महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे.




