पुणे : शहरातील शासकीय वसतिगृहांमध्ये बाहेरून खाद्य मागविण्यास अद्याप नियमाने आडकाठी नसली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी वसतिगृहे करत आहेत. ऑनलाइन डिलिव्हरीच्या निमित्ताने घरात घुसून होणारे गैरप्रकार, तसेच या माध्यमातून बेकायदा वस्तू, पदार्थ पोहोचविण्याची शक्यता लक्षात घेऊन ही नियमावली तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मोशी येथील शासकीय वसतिगृहात खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविल्याने, संबंधित विद्यार्थिनींचा वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्याची नोटीस बजावून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून समज देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर, शासकीय वसतिगृहांचा आढावा घेतला असता, समाजकल्याण विभागाची वसतिगृहे वगळता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेच्या वसतिगृहात बाहेरून खाद्य पदार्थ मागविण्यास आडकाठी नाही. मात्र, मोशी येथील घटनेनंतर वसतिगृहाच्या नियमावलीत ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबतचा नियम समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.