
पुणे : बेरोजगारी आणि वाढत्या नशाखोरीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. ‘नोकरी द्या… नशा नको,’ आणि ‘भाजप सरकार हाय हाय..’ अशा घोषणा देत युवक काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. दरम्यान, काँग्रेस भवनाकडून डेक्कन परिसरात निघालेल्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, राज्य प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी एहसान खान, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, अॅड. अभय छाजेड, कुमार रोहित, अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, आनंद दुबे आणि मेघश्याम धर्मावत आदी प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘देशात बेरोजगारी आणि नशेखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुजरातमधील एका खासगी बंदरात हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले गेले. त्याचे पुढे काय झाले ? यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होत आहेत. याविरोधात युवक काँग्रेसतर्फे देशव्यापी आंदोलन केले जात आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या मित्राला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,’असे चिब म्हणाले.
‘पुण्यात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. विद्योचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र, आता अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीमुळे पुण्याचा नावलौकिक खराब होत आहे,’ असा आरोप सौरभ अमराळे यांनी केला.




