
नदी-नाल्यात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा निचरा करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पाठपुरावा सुरू केला आहे. पीएमआरडीएच्या हद्दीतील ११ ठिकाणी मलनिस्सारण योजनेअंतर्गत प्रकल्प राबवला जाणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया होऊन पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च आहे.
घरांघरातील सांडपाणी नदी, नाल्यात मिसळल्याने प्रदूषणात भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ११ ठिकाणी मलनिस्सारण योजना राबवण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत निस्सारण योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे (एसटीपी) पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला जाणार आहे. त्यानंतर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सध्या भूकूम या ठिकाणच्या एसटीपीचे काम सुरू करण्यात आले आहे. ६ कोटी १३ लाख रुपयांची निविदा रक्कम आहे. १८ महिने कामाची मुदत आहे. उर्वरित कामांची प्रक्रियाही चार महिन्यांत सुरू होणार आहे.
या ठिकाणी मलनिस्सारणाची कामे
पीएमआरडीएच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये ११ ठिकाणी मलनिस्सारणाची कामे होणार आहेत. यामध्ये भूगाव, भूकुम, पिरंगुट, लवळे, हिंजवडी, माण, घोटवडे, चाकण-मेदनकरवाडी, शिक्रापूर-सणसवाडी, मारुंजी, केसनंद व चाकण परिसरातील इतर गावांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया होत असेल तर ती स्वागतार्ह आहे. मात्र लवकर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे. त्यामुळे पुढील होणारे नुकसान टळेल.
– गुरुदास इरले, स्थानिक नागरिक, माण
केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत निस्सारण योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीत एकूण ११ ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर टेंडर राबवून पुढील कार्यवाही केली जाईल.
– योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए




