
पिंपरी -: चऱ्होली येथील चोविसावाडी परिसरात दहा ते पंधरा बेकायदेशीर क्रशर प्लांट सुरू आहेत. हे क्रशर रात्रंदिवस सुरू असतात. या क्रशरकडून गौण खनिजांचे प्रचंड उत्खनन सुरू आहे. या क्रशरने हवा आणि ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या सात-आठ वर्षात चोविसावाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प झाले. यामुळे हजारो नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आल्याने नागरिकांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. या क्रशरमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषण वाढू लागल्याने त्यांचा त्रास सोसायटीतील नागरिकांना होत आहे. नागरिकांच्या घरात, वाहनांसह हवेत धूळ पसरत आहे. क्रशरमुळे हवेत धूळ मिसळून हवेची गुणवत्ता ढासळून ३०० पेक्षा अधिक हवेचा निर्देशांक गेला आहे. हे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा जास्त मानले जाते.
तेथील नागरिकांसह अबालवृद्ध, महिला, लहान मुलांचे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
चोविसावाडी येथील सर्वे क्रमांक ८७, ८८, ८९ यासह परिसरातील हे सर्व क्रशर बंद करा, अशी मागणी प्रणाम टॉवर, कोरल पार्क, सफायर टॉवर, ग्रीन व्हिलेसह अन्य सोसायटीतील शेकडो नागरिकांनी केली आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असलेल्या चऱ्होली येथील चोविसावाडी परिसरात आवश्यक परवानगी न घेता क्रशर प्लांट सुरू आहेत. हे क्रशर प्लांट सोसायटीपासून अगदी ५०० ते ७०० फूट अंतरावर आहेत. या क्रशरचालकांनी कित्येक वर्षापासून बेकायदेशीर खाणीमधून गौण खनिज उत्खनन केले जात आहे. क्रशरचालकांकडून पर्यावरण नियमांचे पालन न करता सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. दिवस-रात्र क्रशर सुरू राहिल्याने मातीचा धुरळा हवेत उडत असतो. यामुळे त्या भागात हवा आणि ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
चोविसावाडी भागात प्रणाम टॉवर, कोरल पार्क, सफायर टॉवर, ग्रीन व्हिलेसह अन्य सोसायटीत गेल्या सात वर्षांपासून वास्तव्यास आहेत, तर शेकडो गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या क्रशर प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात हवेत धूळ मिसळून हवा आणि ध्वनिप्रदूषण वाढले आहे. सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या नाकातोंडात धूळ जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
धूळ हवेत जात असल्याने हवा अशुद्ध होत आहे. त्यात ‘क्रशर प्लांट’ हे रात्रंदिवस सुरू राहिल्याने ध्वनिप्रदूषणदेखील वाढले आहे. या क्रशर प्लांटमुळे लहान मुले, शाळेचे विद्यार्थी, अबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिलांसह पुरुषांना श्वसनाचा त्रास वाढला आहे. हे क्रशर प्लांट तत्काळ बंद करावे, अशी मागणी सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अप्पर तहसीलदार आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान क्रशर बंद व्हावे, म्हणून प्रणाम टॉवर, कोरल पार्क, सफायर टॉवर, ग्रीन व्हिलेसह अन्य सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी (दि. १५) स्थानिक आमदारांनी प्रणाम सोसायटीला भेट घेत हे क्रशर बंद होतील, असे आश्वासन नागरिकांना दिले. यावेळी प्रणाम टॉवर्स सोसायटीचे चेअरमन मीनाक्षी राहिंज, नम्रता तापकीर, प्रफुल्ल मोहन राणे, ज्येष्ठ नागरिक विनायक शिंदे, हेमंत पाटील, छाया कोळी, राजीव त्रिपाठी, कोरल पार्क सोसायटीचे गोविंद पवार, सफायर टॉवर्सचे दत्ता खरवंदे आणि रिद्धी-सिद्धी सोसायटीचे विश्वजीत कदम यांच्यासह सोसायटीतील सभासद, महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनधिकृत क्रशर प्लांट अनेक वर्षांपासून सुरू
चऱ्होलीतील चोविसावाडीत गृहप्रकल्पांची संख्या वाढली आहे. त्या प्रकल्पांसाठी वाळू, खडी हे मटेरियल प्लांटमधून मिळत आहे. सर्वच क्रशर प्लांट हे दिवसरात्र सुरू असतात. यामुळे परिसरात वाहनांची वर्दळ आणि प्लाँटमधील मशिनचा कर्कश आवाज कायम सुरू असतो. परिणामी चोविसावाडी भागातील सोसायटीतील नागरिकांना अशुद्ध हवा, ध्वनिप्रदूषणामुळे रात्रभर झोपच लागत नाही. त्यामुळे सदरील क्रशर प्लांटवर तत्काळ कारवाई करून हे प्लांट बंद करा, अशी मागणी सोसायटीतील नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
विद्यार्थ्यांना दिवसभर धुळीचा त्रास
चोविसावाडी परिसरात रेड क्लीप नावाने स्कूल सुरू आहे. पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. सदर क्रशर प्लांटच्या धूळ आणि आवाजाचा विद्यार्थ्यांनादेखील त्रास होत आहे. विद्यार्थ्यांच्या वर्गात बेंच धुळीने माखलेले असतात. त्याशिवाय दिवसभर क्रशरमधून निघणाऱ्या ट्रक, हायवा तसेच इतर वाहनांमुळे अपघाताचीदेखील शक्यता आहे. हवा प्रदूषणाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
हवेच्या निर्देशांकाने ओलांडला ३००चा टप्पा
चोविसावाडी येथील बेकायदेशीर क्रशरमधून निघणा-या धुळीमुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या भागातील हवा खराब श्रेणीत पोहोचलेली आहे. खराब हवेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोकादेखील वाढत आहे. हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) आदर्शपणे १०० च्या खाली असणे आवश्यक आहे. तथापि, आमच्या परिसरात एक्यूआय पातळी खराब श्रेणीत गेली आहे. परिणामी दमा आणि हृदयाची समस्या असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हवेची गुणवत्ता अत्यंत ‘खराब’ दर्जापर्यंत घसरली आहे, असे सोसायटीतील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
सारथीवर वारंवार तक्रार, नोटीस देऊनही दखल नाही
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सारथी वेब पोर्टलवर क्रशर प्लांटबाबत विविध सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारी केलेल्या आहेत. सदर क्रशर प्लांट चालविणाऱ्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून २७ एप्रिल २०२३ मध्ये नोटीस देऊन सात दिवसात प्लांट बंद करण्यास सांगितले होते. तरीही आजतागायत हे क्रशर प्लांट सुरूच आहेत.
क्रशर प्लांटमधून निघणाऱ्या प्रदूषित धुळीचा थेट परिणाम आमच्या आरोग्यावर होत आहे. हवेत तरंगणारे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकण नाकातोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यातून श्वसनसंस्थेच्या विकाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठांना नियमित मास्क वापरण्याची वेळ आलेली आहे.
– राजीव त्रिपाठी, प्रणाम टॉवर्स, चोविसावाडी
क्रशर प्लांटमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषण होऊ लागले आहे. २४ तास सुरू असलेल्या क्रशर प्लांटने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. हे क्रशर प्लांट बंद करावे.
– छाया कोळी, रहिवासी, प्रणाम टॉवर्स
बेकायदेशीर क्रशरसंदर्भात अनेकदा तक्रार अर्ज देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या क्रशरने धूळ निर्माण होऊन प्रदूषण होत असतानादेखील बिल्डरांना नव्याने गृहप्रकल्प साकारण्यास ना हरकत दाखले दिले आहेत. ही नागरिकांची फसवणूक आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हे क्रशर बंद होणे आवश्यक आहे.
– विनायक शिंदे, ज्येष्ठ नागरिक
क्रशर बंद करण्यासाठी यापूर्वी अनेकदा तक्रार अर्ज दिले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. येत्या पंधरा दिवसात हे क्रशर बंद न केल्यास या भागातील सर्व सोसायटी रहिवासी, गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करणार आहे.
– हेमंत पाटील, ज्येष्ठ नागरिक
चोविसावाडीत १५ ते २० क्रशर सुरू आहेत. हे क्रशर बंद करावे, अशी येथील सोसायटी रहिवाशांची मागणी आहे. त्यानुसार सर्व क्रशरची तपासणी करून बेकायदेशीर असलेल्या क्रशरवर तत्काळ कारवाई करत ते बंद केले जातील.
– जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
क्रशर सुरू करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली असते. मात्र, हवा आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्या चोविसावाडीतील क्रशरने आवश्यक परवानगी घेतल्या का, याबाबत तपासणी केली जाईल. हवा आणि वायुप्रदूषण करणाऱ्या क्रशरवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच हे क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविण्यात येईल.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका




