
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांची इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. तसे संकेत टेस्लाने (Tesla) दिले आहेत. लिंक्डइनवरील जॉब पोस्टिंगनुसार, टेस्ला इंकने भारतात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची नुकतीच अमेरिका दौऱ्यादरम्यान भेट झाली होती. यानंतर लगेचच टेस्लाने भारतात लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
टेस्ला मुंबई आणि दिल्लीत सर्व्हिस टेक्निशियन्स आणि ॲडव्हाजरसह विविध पदांसाठी उमेदवाराच्या शोधात आहे. विशेषतः मुंबईत कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशालिस्ट यासारख्या इतर पदांसाठी टेस्ला भरती करत आहे.
टेस्लाने यापूर्वीदेखील भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी इच्छा दर्शवली होती. पण वाढीव आयात शुल्काचा मुद्दा पुढे आला होता. दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच ४० हजार डॉलरपेक्षा अधिक किमतीच्या उच्च दर्जाच्या कारवरील मूलभूत सीमा शुल्क ११० टक्क्यांवरुन ७० टक्क्यांपर्यंत कमी केले. यामुळे भारत ही लक्झरी ईव्ही उत्पादकांसाठी अधिक आकर्षित करणारी बाजारपेठ बनत आहे.
चीनच्या तुलनेत भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर कमीच
चीनच्या तुलनेत विचार केला तर भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. गेल्या वर्षी भारतात ईव्हीची विक्री सुमारे १ लाख युनिट्सच्या जवळ पोहोचली होती. तरीही चीनच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. चीनमध्ये याच कालावधीत १ कोटी १० लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. भारत सरकार स्वच्छ ऊर्जा उपायांसाठी प्रयत्न करत आहे. तसेच सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर टेस्ला भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
