
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील भावनिक क्षणांनी तर प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. गुजरातमधील भरूचमध्ये तर छावा चित्रपट सुरू असताना अत्यंत भावनिक दृश्य पाहून एका प्रेक्षकाने रागाच्या भरात चित्रपटगृहाचा पडदा फाडला.
पोलिसांनी संबंधित प्रेक्षकाला ताब्यात घेतले आहे. जयेश वसावा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जयेश हा दारूच्या नशेत होता. त्याने चित्रपटगृहाच्या पडद्याजवळ चढून अग्निशामक यंत्राने पडद्याचे नुकसान केले. त्याच्यावर मालमत्तेचे नुकसान करणे आणि अश्लील शब्द वापरणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरके सिनेमाजचे जनरल मॅनेजर आरव्ही सूद यांनी सांगितले की, ‘कर्मचाऱ्यांकडून मला फोन आला की एका प्रेक्षकांने अग्निशामक यंत्राने स्क्रीन खराब केली आहे आणि ती फाडली आहे. त्यानंतर पोलिसांना कळवले आणि त्या प्रेक्षकाला ताब्यात दिले. सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या शोसाठी आम्ही स्क्रीन वापरू शकलो नाही.
