पिंपरी : अनधिकृतपणे विनापरवाना जाहिरात होर्डिंग लावल्याबद्दल तसेच, परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग लावल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने तीन जणांवर कारवाई केली. त्यांच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडी-रावेत उड्डाण पुलावरील दिशादर्शक फलकाच्या कमानीवर वाढदिवसाचा शुभेच्छा देणारा अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आला होता. त्या जाहिरातीची पाहणी करून लिपिक संजय भोईर व परवाना निरीक्षक धनंजय पाटील यांनी रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून ऋषिकेश मानगावकर आणि रोहित चव्हाण यांच्या विरुद्ध सोमवारी (दि.17) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरात अनधिकृतपणे विनापरवाना जाहिरात होर्डिंग तसेच, फ्लेक्स, किऑक्स, पोस्टर, फलक लावण्यास बंदी आहे. अशा विनापरवाना जाहिरात होर्डिंग व फ्लेक्सबाबत महापालिकेने कठोर धोरण अवलंबले आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून शहरभरात नियमितपणे कारवाई केली जात आहे. तसेच, आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून दंडात्मक कारवाईसह पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत.




