पुणे: पीएमपीमधील सर्व कामकाज आणि लिखापढीची कार्यालयीन कामे मराठी भाषेतच करा. पीएमपीतील काम आता मराठी भाषेतच व्हायला पाहिजे, असे सक्त आदेश पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिले आहेत. कडक शिस्तीनंतर आता नार्वेकर यांनी आपला दुसरा पॅटर्न लागू केला असून, पीएमपीतील कामकाजात मराठी भाषा बंधनकारक केली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांच्यामार्फत पीएमपीचा कारभार चालवला जात आहे. हाच कारभार आणखी शिस्तबध्दपणे चालावा, याकरिता पीएमपी सहव्यवस्थापकीय संचालक नार्वेकर सक्त नियम लागू करत आहेत. यामुळे प्रशासनाचे कामकाज शिस्तबध्द होत असून, वेळेत होत आहेत. याचा सकारात्मक परिणाम आगामी काळात पाहायला मिळणार असल्याचा विश्वास पीएमपीच्या वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागप्रमुख, आगार व्यवस्थापक कर्मचार्यांना पुनःश्च कळविणे येते की, प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यात यावा. सर्व पत्रव्यवहार, कार्यालयातील कामकाज, सर्वसामान्यांपर्यंत जाणारे सर्व नमुने, पत्रके, परवाने, नोंदवह्या, प्रमाण नमुने, प्रपत्रे, विभागीय नियम पुस्तिका, सर्व प्रकारच्या टिपण्या, नसत्या, शेरे, अभिप्राय, आदेश, अधिसुचना, प्रारूप नियम, कार्यालय परिपत्रके, करारनामे, अहवाल, बैठकांची इतिवृत्त, इत्यादी मराठी भाषेमध्ये करणे आवश्यक आहे.
तसेच कार्यालयातील नामफलकावर एखादी व्यक्ती/अधिकारी/कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. कार्यालयीन नामफलकांवर एखादी व्यक्ती/अधिकारी/कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे भाषांतर न करता मराठीतूनच लिहावे. तसेच कार्यालयातील निविदा, ठेकेदारांशी केलेले करार/वेगवेगळ्या कंपन्या/आस्थापनांशी केलेले करार राजभाषा अधिनियम 1964 नुसार हे सर्व मराठी भाषेतून करावे.
शासन आदेशानुसार महामंडळातील सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख कर्मचारी यांनी दिलेल्या सूचनांनुसार मराठीतून कामकाज करावे. राजभाषा अधिनियम 1964 नुसार कार्यालयीन कामाकाजासह अंतर्गत सर्व कामकाज मराठीतच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल




