पिंपरी: शहरातील खासगी आरओ प्लांटचालकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज करावा. नोंदणी नसलेल्या आरओ प्लांटवर कारवाई केली जाणार आहे.
जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील खासगी आरओ प्लांट आणि वॉटर एटीएमची तपासणी केली. त्यात ते पाणी दूषित असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरओ प्लांट व वॉटर एटीमएम बंद करण्यात आले होते. एफडीओकडून या प्लांटवर कारवाई केली जात नसल्याने महापालिकेने त्यासंदर्भात नवीन निमावली तयार केली आहे. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी (दि.22) मान्यता दिली आहे.
मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लांट देखभाल-दुरुस्ती करणारी संस्था यांच्याकडून त्या प्लांटच्या आउटलेटचे पाणी मानक, आयएस 10500 (2012) व डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शुध्दीकरण करण्यासाठी प्लांट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा. पुण्यातील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रयोगशाळेकडून आरओ प्लांटद्वारे येणारे पाणी पिण्यास योग्य असल्याबाबत दर महिन्याला स्रोतामधील पाणी व शुद्ध केलेले पाणी यांची गुणवत्ता तपासणी करावी. टेस्ट रिपोर्ट त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावा.
संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करावा. आरओ प्लांटसाठी महापालिकेचे पाणी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तो नळजोड अनधिकृत असल्यास अधिकृत करून घ्यावा. बिगर घरगुती दराने मीटरनुसार त्या पाण्याचे बिल महापालिकेकडे भरावे. तसे न केल्यास नळजोड आणि आरओ प्लांट कायमस्वरूपी बंद केले जाईल, असे नियमावलीत नमूद केले आहे.
- 58 खासगी आरओ प्लांट सुरू करण्यास परवानगी
पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्याने, या भागातील 58 खासगी आरओ प्लांट तपासणी करून पाणीपुरवठा विभागाने बंद केले होते. मात्र, पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक अटी व शर्तींसह या प्लांटला पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी काही अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
- नियम उल्लंघन केल्यास प्लांट बंद करणार
महापालिकेच्या नव्या नियमांमुळे नागरिकांना शुद्ध व योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. आरओ प्लांटधारकांनी महापालिकेने दिलेल्या अटी व शर्ती आणि नियमांचे पालन करावे. अधिकृत परवानगी घेऊनच आरओ प्लांट सुरू ठेवावेत. अन्यथा कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी इशारा दिला आहे.



