पिंपरी : महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५२० मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी पाच मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करण्याचा इशारा दिला आहे.
करसंकलन विभागाकडून जप्ती मोहीम डिसेंबर २०२४ पासून तीव्र करण्यात आली. थकबाकी असलेल्या ८७७ मालमत्ता लाखबंद (सील) करून जप्त केल्या. त्यात बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र अशा मालमत्तांचा समावेश आहे. आतापर्यंत ३५७ मालमत्ताधारकांनी थकबाकी भरली आहे. उर्वरित ५२० मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. थकबाकीदारांना देयक भरण्यासाठी पाच मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. जे कराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ताकरावर अधिकचा १५ टक्के लिलाव खर्च लावण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालमत्ताधारकांना लिलावातून वाचवण्यासाठी मर्यादित संधी असणार आहे. मालमत्ताधारकांनी लिलावाची जाहीर सूचना प्रसिद्ध होईपर्यंत तत्काळ संपूर्ण थकीत कराचा भरणा करून लिलावप्रक्रिया टाळावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केले आहे.




