मुंबई : देशातील सर्व विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ’सीयूटीई-पीजी २०२५’ परीक्षेचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ही परीक्षा १३ मार्च ते १ एप्रिल २०२५ दरम्यान होणार आहे. १५७ विषयांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा तीन सत्रांमध्ये होणार आहे.
देशातील बनारस हिंदू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, काश्मीर केंद्रीय विद्यापीठ, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ लखनऊ, जामिया मिलिया इस्लामिया, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ या सारख्या देशातील अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ व खासगी विद्यापीठांमध्ये एमएससी, एमए, एमकॉम, एमबीए, एमटेक, एमएफए यासारख्या अनेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी क्युट-पीजी परीक्षा एनटीएतर्फे घेतली जाते.



