पिंपरी : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रुग्णांना वैद्यकीय सेवासुविधा उत्तम दर्जाच्या मिळाव्यात, म्हणून वैद्यकीय विभागाकडून विविध प्रकारची रुग्णालये आणि विभाग सुरू करण्यात येत आहेत. महापालिकेच्या सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात वैद्यकीय सुविधांच्या सक्षमीकरणासाठी भरघोस तरतूद केली आहे. यामुळे 100 बेडचे कॅन्सर रुग्णालय, 30 बेडचे बर्न रुग्णालय, ट्रामा युनिट, डायलिसिस युनिट, प्लास्टिक सर्जरी विभाग, 250 बेडचे प्रसूती व बालरोग रुग्णालय उभारण्यास मोठी तरतूद केली आहे. तर शहरात 70 ठिकाणी शहरी आरोग्य केंद्र (जिजाऊ क्लिनिक) सुरू करण्यात येत आहेत.
वाढलेली महागाई, त्यात वैद्यकीय औषधोपचार व खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागातील सर्वसामान्यापासून मध्यमवर्गीय तसेच, गरजू नागरिक महापालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वैद्यकीय विभागाकडून नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये 8 मोठी रुग्णालये, 27 दवाखाने, 20 आरोग्य केंद्र, 8 कुटुंब नियोजन केंद्र, 36 लसीकरण केंद्र आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय हे 750 बेड क्षमतेचे सर्वांत मोठे रुग्णालय आहे. 400 बेडचे नवीन थेरगाव रुग्णालय, 100 बेडचे नवीन भोसरी रुग्णालय, 130 बेडचे नवीन आकुर्डी रुग्णालय आणि 120 बेडचे नवीन जिजामाता रुग्णालयांसह एक हजार 589 बेडची व्यवस्था महापालिकेच्या इतर रुग्णालयांत आहेत.
सर्व रुग्णालयांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेन्ट इन्फोर्मेशन सिस्टिम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे उपचार घेतलेल्या रुग्णांची माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळतील.
दोन रुग्णालयांत वैद्यकीय अभ्यासक्रम
कॅन्सर रुग्णालयाचे काम महिन्याभरात सुरू करणार
नवीन थेरगाव रुग्णालयाशेजारी 100 बेडचे कॅन्सर (कर्करोग) रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीवर (पीपीपी) तत्वावर ते रूग्णालय असणार आहे. तेथे रूग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध होतील. महिन्याभरात त्या इमारतीचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. जुन्या तालेरा रुग्णालयात 30 खाटांचे बर्न (जळीत) रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. तेथे प्लास्टिक सर्जरीसाठी स्वंतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे.




