पिंपरी : पुणे, पिंपरी चिंचवड शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा फास आवळत आहे. यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिका, पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ हे संयुक्तरित्या मोहीम आखणार आहेत. वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठकीत विविध यंत्रणांच्या अधिकार्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पुढील 30 दिवसांमध्ये कार्यवाही करण्याचे निश्चित केले.
पीएमआरडीए कार्यालयात या अधिकार्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत पुणे शहराभोवती असणार्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गावर वाहतूक कोंडीबाबत विविध विभागांनी आपले मत नोंदविले. त्यानुसार, रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेले दुकाने, गाळे, बांधकामे व इतर बांधकामांवर सर्व विभागांनी कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीस पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पिपरी चिंचवड वाहतूक विभागाचे उपयुक्त बापू बांगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, सहायक पोलिस आयुक्त नंदिनी वग्याणी, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मिनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे सह शहर अभियंता हरीयाल नरेश, एमआयडीसीचे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे मनपाचे उपअभियंता महेश पाटील, सा. बां. विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसी एम. एस. भिंगारदेवे, संभाजी लाखे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




