पिंपळे सौदागर : पिंपरी चिंचवड महापालिकेने रहाटणी गावातील रिंगरोड तयार केला. या रस्त्यावर डांबरीकरण, ड्रेनेज, लाईट आणि इतर आवश्यक सुविधा पुरविल्या होत्या. मात्र, या रस्त्यावर एका बिल्डरने मोठे मोठे दगड टाकून रस्ता वाहतूक बंद केली आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
या रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महापालिकेने केलेली उपाययोजना नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. रिंगरोड हे रहाटणी गावातील मुख्य वाहतूक मार्ग असून, त्यावरून हजारो नागरिक प्रवास करत असतात. मात्र, अचानक रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्यास सुरवात झाली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन विस्कळीत झाली आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे आणि बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “रहाटणी गावात अनेक लोक कामासाठी आणि इतर कारणांसाठी या रस्त्याचा वापर करत होते. बिल्डरने रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत त्वरित लक्ष दिल्याचे सांगितले असून, योग्य कारवाईची आश्वासन दिले आहे. मात्र, नागरिकांची नाराजी अद्याप कायम आहे. महापालिका आणि संबंधित अधिकारी या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करतात का आणि नागरिकांच्या रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करतात का हे पहावे लागणार आहे.




