मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट मुंबई टेक वीक पार पडत आहे. त्यामुळे मुंबई ही टेकची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. इतकेच नाही, तर आता राज्य सरकारच्या ५०० सर्व्हिसेस व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यासाठी राज्य सरकारने मेटा या कंपनीसोबत करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई टेक इव्हेंटमध्ये आम्ही मेटासोबत एक करार केला आहे. त्यानुसार आता राज्यातील अनेक सेवा या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळू शकतील. मुंबई मेट्रोचे तिकीट जेव्हा आम्ही व्हॉट्सअॅपवर आणले त्यावेळी ५०% पेक्षा जास्त तिकीट व्हॉट्सअॅपवर निघाली, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आता राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. त्यामुळेच व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सच्या माध्यमातून ५०० सर्व्हिसेस नागरिकांना मिळतील, असा दावादेखील त्यांनी केला.
अनेक बिझनेसमन मुंबईत तयार झाले आहेत. त्या प्रत्येकाची एक कथा आहे आणि त्यामुळेच आंत्रप्रेन्युअर म्युझियम तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसेच इनोव्हेशन सिटीसंदर्भात आधीच घोषणा झाली आहे. त्यासंदर्भात टेक संघटनेसोबत एक करार झालेला आहे. या असोसिएशनशी जोडलेल्या टेक लिडर्सच्या माध्यमातून या सिटीसाठी या व्यक्ती काम करणार आहे, असेही ते म्हणाले.



