पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक पाणीपुरवठ्याच्या विस्कळिततेमुळे अडचणींमध्ये आहेत. या प्रश्नाला विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी उचलून धरले असून, त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मग पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या जीवावरती निवडून जाणारे आमदार अधिवेशनात काय करतात, असा प्रश्न नागरिकांना पडताना दिसत आहे.
शहराची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यानुसार पाणीपुरवठ्याची मागणी लक्षात घेतल्यास, सध्या पाणीपुरवठा अपुराच असल्याचे दिसून येते. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 35 लाखांपर्यंत पोहोचली असून, या लोकसंख्येसाठी 750 दशलक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. तथापि, सध्याचा पाणीपुरवठा फक्त 620 दशलक्ष लिटरच आहे, ज्यामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. या समस्येची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शहराला सध्या पाणी पुरवठा करणारे पवना धरण 520 एमएलडी, आंध्रा धरण 80 एमएलडी, आणि एमआयडीसी कडून 20 एमएलडी असे एकूण 620 एमएलडी पाणी उपलब्ध आहे. तरीही, वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा खूपच अपुरा पडत आहे. पाणी प्रश्नावर राजकारण करत असतानाही शहरातील पाचही आमदार यावर विधानसभेत कुठल्याही प्रकारे बोलताना दिसत नाहीत.
याबाबत एक मोठा प्रश्न उभा आहे – पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे लक्ष का दिले नाही? दुसरीकडे, मुंबईतील विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांना पिंपरी चिंचवड शहरातील पाणी प्रश्नाची गांभीर्याची जाणीव झाली आहे, हे विशेष आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना असं वाटत आहे की, स्थानिक आमदारांची उदासीनता आणि त्यांचे दुर्लक्ष यामुळे शहरातील पाणी प्रश्न सुटत नाही. नागरिकांच्या या समस्येवर स्थानिक आमदारांनी लक्ष दिल्यास, पाणीपुरवठ्याच्या विस्कळिततेच्या प्रश्नावर काही उपाययोजना होऊ शकतात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



