
पिंपरी : खेड तालुक्यातील केंदूर घाटात दरोडेखोरांबरोबर झालेल्या चकमकीत पोलीस उपायुक्त आणि सहायक निरीक्षक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला, तर दुसऱ्या अल्पवयीन दरोडेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.
खेडमधील बहुळ येथे २३ फेब्रुवारी रोजी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून ६ दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. हे दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी चोरीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. चिंचोशी गावातील केंदूर घाट येथील मंदिरात दरोडेखोर दबा धरून बसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात दरोडेखोर सचिन भोसले याने पोलिसांवर वार केला.
चकमकीदरम्यान पोलिसांनी अटक केलेला सचिन भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर दुखापत, घरफोडी, चोरी, दरोडा, दरोड्याची तयारी असे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हल्ल्यात पोलीस उपायुक्त आणि सहायक निरीक्षक दोघेही जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोपी सचिन हा सराईत आहे.
– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड




