मुंबई : इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम परीक्षा संपेपर्यंत अंतिम टप्प्यात येते. मात्र, यंदा पेपरवाटपाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने घातलेल्या घोळामुळे अद्यापपर्यंत मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका परीक्षकांपर्यंत पोहोचल्या नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
तसेच शिक्षकांकडे पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या किती आहे, याबाबत राज्य मंडळाकडून व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती मागवल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तरपत्रिकेचे विभाजन करताना कोणतेही नियोजन न करता विषम पद्धतीने त्याचे वाटप केल्याने काही नियामकांकडे कमी, तर काही जणांकडे जास्त उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या. राज्य मंडळाकडून नियामकांकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या तरी त्यांना परीक्षकांची माहिती देण्यात आली नाही. तसेच, नियामक आणि परीक्षक हे परस्परांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने परीक्षकांपर्यंत उत्तरपत्रिका उशिरा पोहोचल्या, तर काही परीक्षकांकडे उत्तरपत्रिका पोहोचल्याच नाहीत.
मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका सर्व परीक्षकांकडे वेळेत पोहोचल्या असून, त्या तपासणीचे काम सुरू आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचण आहे का, याची माहिती घेण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका नियामकांकडे पाठविताना त्याच्या नोंदी विभागीय कार्यालयाकडून घेतल्या जातात. त्यामुळे अशी कोणतीही माहिती मागवण्यात आली नाही.
-ज्योत्स्ना शिंदे-पवार, प्र. विभागीय सचिव, राज्य मंडळ, मुंबई



