पुणे : केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळांतील ९ हजार ७४९ विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा लागू करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पीएम श्री शाळा योजनेंतर्गत वाहतूक, मदतनीस सुविधेचा लाभ घेणाऱ्या बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यास प्रतिविद्यार्थी प्रतिवर्ष सहा हजार रुपये लागू आहेत. २०२५-२६साठी एक किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर परिसरातून येणाऱ्या ९ हजार ७४९ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील ६ हजार १७८, तर माध्यमिक स्तरावरील ३ हजार ५७१ याप्रमाणे विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांची आधार नोदणी आणि वैधता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून योजनेला मान्यता देण्यात आली आहे. मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने पीएम श्री शाळा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रस्तावांतर्गत विद्यार्थी लाभ घेण्यास पात्र आहेत, याची खात्री करावी. या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी रामदास धुमाळ यांनी शासन निर्णयात नमूद केले आहे.