पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीच्या कामाला येत्या आठवडाभरात सुरुवात होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (५ मार्च) सर्व उड्डाणे नवीन टर्मिनलवरून होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे क्षेत्र ५२,००० चौरस मीटरपर्यंत पसरलेले आहे. त्यामध्ये १० उन्नत पूल, ३४ आगमन नोंदणी कक्ष, २५ स्वयंचलीत नोंदणी कक्ष, ५ प्रवाशी पिशव्या तपासून प्रवाशांपर्यंत पोहचणारी यंत्रणा (बॅग्ज कॅरोसेल) आहेत. पुणे विमानतळावर दिवसेंदिवस उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढत असल्याने जुन्या टर्मिनलची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीमुळे विमानांची वाहतूक नवीन टर्मिनलवर टप्प्याटप्याने स्थलांतरीत करण्यात येत आहे. सध्या जुन्या टर्मिनलवरून १६ विमानांची उड्डाणे होतात. येत्या पाच मार्चपासून ही पूर्ण उड्डाणे नवीन टर्मिनलवरून होणार आहेत. जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
विमानांची उड्डाणे नवीन टर्मिनलवर स्थलांतरीत करण्यात आल्याने प्रवाशी पिशव्या तपासणी करण्याच्या यंत्रणेत विलंब होत असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागल्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी भोपाळ ते पुणे हे विमान पुणे विमानतळावर आले. प्रवासासाठी ५५ मिनिटांचा कालावधी लागला. विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांच्या पिशव्या तपासून त्यांच्या हातात मिळेपर्यंत तब्बल ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागल्याने संताप व्यक्त केला.
जुन्या टर्मिनलवर प्रशस्त आरामदायी आणि वातानुकुलीत क्षेत्र, वातानुकुलीत प्रतीक्षाकक्ष, खाद्या पदार्थांची दुकाने, आसन कक्ष, स्वच्छतागृह, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, सुरक्षायंत्रणा आदी प्रवाशांसाठी सुविधा करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासापूर्वीची पडताळणी करण्यासाठीची सुविधा (इमिग्रेशन) आणि ‘डीजी यात्रा’ सुविधांचा अंतर्भावही नवीन टर्मिनलमध्ये असणार आहे.