दौंड : दौंडमध्ये कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं आढळली आहेत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ही अर्भक सापडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दौंडच्या बोरावकेनगरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. ही अर्भकं कुठून आली पोलिसांकडून यासंदर्भात शोध सुरू आहे.
दौंडच्या बोरावके नगरमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं ही आढळून आली आहेत. प्लास्टिकच्या बरणीमध्ये ती अर्भकं सापडली आहेत. त्यामध्ये अर्बकांचे काही शारीरिक अवशेष आढळले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात तेथील स्थानिकांनी दौंड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माहिती दिली. त्यानंतर दौंड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही अर्भकं नेमकी कोणाची आहेत, कोणत्या रुग्णालयाने ती फेकून दिली आहेत का, या अनुषंगाने सध्या दौंड पोलिसांकडून तपास सुरू आहे.
राज्य महिला आयोगाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. ‘ पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे.
हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी 2020 पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत,’ असे त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.