
कोल्हापूर : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत मुरलीधर कोरटकर (५०) याला मंगळवारी येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पडताळणीसाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्याची परवानगीही न्यायाधीशांनी पोलिसांना दिली.
कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत फिर्याद दाखल आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर २५ फेब्रुवारीपासून पसार असलेल्या कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले. या वेळी संतप्त शिवप्रेमींनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले.
सूर्यकांत पवार यांनी सरकारच्या बाजूने तर असीम सरोदे यांनी इंद्रजित सावंत यांच्या वतीने युक्तिवाद केला. कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी अटक आणि पोलीस कोठडीला विरोध केला. मात्र न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, कोरटकरविरोधात घोषणाबाजी करत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ जणांवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.



