पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आईबरोबर आलेल्या रुग्णाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये रुग्ण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे राहणारा ४० वर्षांचा रुग्ण मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आईसमवेत वायसीएम रुग्णालयात आला. आई केस पेपर काढत असताना रुग्ण इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी रुग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णाने उडी मारण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, रुग्णाला मानसिक आजार असल्याची शक्यता संत तुकारामनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी व्यक्त केली आहे.




