पिंपरी : सार्वजनिक आरोग्य विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्याकीय विभागाचा दोन पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या श्रेणीत आकुर्डीतील कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयाला पहिल्या क्रमांकाचा, तर आरोग्य वैद्याकीय अधिकारी या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचा ‘महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५’ हा पुरस्कार महापालिकेला मिळाला आहे.
‘महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महापालिकेचे आरोग्य वैद्याकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्याकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक वैद्याकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, डॉ. राजेंद्र फिरके, वैद्याकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर या वेळी उपस्थित होते.
‘राज्यातील सर्वाधिक प्रसूती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र’ या श्रेणीत कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी या रुग्णालयाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच, आरोग्य वैद्याकीय अधिकारी या श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महापालिकेला मिळाला आहे.
या पुरस्कारासाठी वर्षभरात रुग्णालयांद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम याचे मूल्यमापन करून क्रमवारी निश्चित करण्यात आली होती.




