पुणे : पुण्यात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ७० मातामृत्यू झाले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी २६ माता असून, महापालिकेबाहेरील २५, इतर जिल्ह्यांतील १९ माता आहेत. विशेष म्हणजे, एकूण मातामृत्यूंपैकी ५२ मृत्यू हे दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या कुटुंबातील आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत शहरात ७० मातामृत्यू झाले. त्यातील ५२ दारिद्र्यरेषेच्या वरील आणि १५ दारिद्र्यरेषेच्या खालील आणि ३ इतर होते. त्यामुळे सर्वाधिक मृत्यू हे दारिद्र्यरेषेवरील आहेत. मातामृत्यूंमध्ये अशिक्षित ५, आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या १७ आणि आठवीपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या ४५ होत्या. शिक्षणाचा तपशील माहिती नसलेल्या ३ माता आहेत. यात आठवीपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या मातांची संख्या अधिक आहे.
पुण्यात आधीच्या वर्षात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये ७९ मातामृत्यू झाले होते. त्यात महापालिकेतील ३१, महापालिकेबाहेरील ३१, जिल्ह्यांबाहेरील १६ आणि इतर राज्यांतील १ होते. मातामृत्यूंमध्ये दारिद्र्य रेषेवरील ६५ आणि दारिद्र्य रेषेखालील १४ मृत्यू होते. एकूण मातामृत्यूंमध्ये अशिक्षित ९, आठवीपर्यंत शिकलेल्या १४ आणि आठवीपेक्षा जास्त शिकलेल्या ५४ आणि शिक्षणाचे तपशील नसलेल्या २ माता होत्या, असेही आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.



