पुणे : शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे. मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय आणि या दोन्ही प्रकारांत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत.
शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी हे इयत्ता गट, अध्यापनाचे विषय, समांतर आरक्षणासह आरक्षण, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत प्राप्त केलेले गुण, उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन ऑनलाइन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे.
स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. उमेदवारांना मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम निवडता येतील. मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या पदासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. दोन्ही प्रकारांत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम तयार करून ते अंतिम करणे बंधनकारक आहे. प्राधान्यक्रम अंतिम न केलेले उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत.